नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कॉंग्रेसचे चाणक्य अशी ख्याती असलेल्या अहमद पटेल यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पटेल यांच्या निधनानंतर कॉंग्रेसमध्ये कोषाध्यक्ष आणि संघटन पद कोणाला द्यायचे, याबाबत जोरदार मंथन सुरु झाले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या नावांवर पक्षात जोरदार चर्चा सुरु आहे. कॉंग्रेस पक्षाचा कोषाध्यक्ष आणि संघटन स्तरावरील कामाची जबाबदारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्णयानंतर नक्की होईल.
कॉंग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं 26 नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास निधन झालं. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.