लासलगाव – लॉकडाऊन करायचा झाल्यास 8 किंवा 15 दिवसांचा करून चालणार नाही. तर किमान तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागणार आहे, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तीन आठवड्याचा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भुजबळ यांनी येवला-लासलगाव मतदारसंघात अचानक कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी करोना रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली. भुजबळ यांनी प्रथमतः विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
तसेच डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सध्या 30 बेडस कार्यान्वित असून अधिक 10 ऑक्सिजन बेडस वाढविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला आहे. मनुष्य वाचविण्याची ही संकटाची लढाई असून खाजगी डॉक्टर, नर्स व स्वयंसेवी संस्थानी यांनीही या लढ्यात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच होम क्वॉरंटाईन रुग्ण घराबाहेर पडत असल्याने करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, असे सांगतानाच होम क्वॉरंटाईन रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसात तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी केले.