नाशिक – नाशिकमध्ये बुधवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर घडला.
धनंजय कपडनीस, किशोर पवार आणि ज्योत्स्ना टील्लू अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी जवळील मुंडेगाव येथे ट्रक ट्रॅव्हल आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गीतांजली सोनवणे-कपडनीस आणि शेवंता रकीबे हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने समीपच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.