Ahmednagar Weekend Lockdown | नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई; पोलीस कारवाई करणार

नगर – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी ते सोमवारी) जाहीर केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्याच्या काही भागात रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात याव्यात. रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणीही चाचण्यांची संख्या वाढवावी. कन्टेन्टमेंट झोन भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वे करून कोरोना चाचण्या केल्या जाव्यात. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी आता नियोजनपूर्वक गतिमान कार्यवाही करावी. प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करून आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्रीय पथकानेही नगर शहरात नागरिकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत नसल्याबद्दल चिंता व्यक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करावी. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग साठी गावपातळीवर नेमलेल्या पथकाने प्रभावी काम करणे अपेक्षित आहे. तरच, संसर्ग साखळी तोडण्यास मदत होऊ शकेल.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे नियोजन करून संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन त्या वाढवाव्यात. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. जिल्ह्यात ज्या क्षेत्रात बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तेथे रॅपिड ऍन्टिजेन चाचण्या वाढवावयाची गरज आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मागणीनुसार तालुकास्तरीय यंत्रणांना त्या कीटस उपलब्ध करून दिल्या आहेत. चाचण्या केल्यानंतर त्याचा अहवाल पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

“त्या’साठी नेमले पथक
खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्‍सिजन अथवा व्हेंटिलेटर बेडस्‌ रुग्णांनी अडवल्या गेल्या नाहीत ना हे तपासण्याची सूचना त्यांनी केली. एखाद्या रुग्णाला गरज नसेल तर “स्टेप डाऊन’ याप्रमाणे त्याला कोविड केअर सेंटर अथवा इतरत्र शिफ्ट करुन दुसऱ्या रुग्णाला ते बेडस उपलब्ध करुन दिले पाहिजे, याशिवाय, जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्‍शन मिळण्यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.

याशिवाय, त्यासंदर्भात काही तक्रारी येत आहेत. यापुढील काळात खासगी डीसीएचसी यांना रेमडेसिविर दिल्यानंतर तो साठा संपल्यानंतर रिकाम्या व्हाल्व्हज परत केल्यानंतरच नवीन साठा उपलब्ध करून दिला जाईल. महानगरपालिकेनेही त्यांचे पथक या रुग्णालयांमध्ये ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.