मुंबई – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून सुरू केलेल्या ऑनलाईन समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवेबद्दल माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन कोव्हिड १९ च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही समुपदेशन सेवा वेब-आधारित स्वरूपात दिली जात आहे.
विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे. विभागातील सर्व प्राध्यापक समुपदेशन कार्यक्रमाचा भाग असून, डब्ल्यूएचओ, एपीए आणि अन्य व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वे वापरून विभागाने एक कोव्हिड १९ समुपदेशन प्रोटोकॉल विकसित केला आहे. अशा प्रकारे इतर विद्यापीठांनीही सुविधा सुरू करावी असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.