कामगिरी सिद्ध कर धोनीला बीसीसीआयकडून संकेत

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) आपली तंदुरुस्ती आणि कामगिरी सिद्ध कर तरच भारतीय संघात स्थान मिळेल अन्यथा निवड समिती याबाबत अंतिम निर्णय घ्यायला मोकळी असेल अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्पष्ट संकेत दिले आहेत.

गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत पराभूत झाल्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याचवेळी धोनी संघात कधी परतणार यावरून तसेच तो निवृत्ती घेणार का, अशा प्रश्‍नांनी जोर धरला होता. कारकिर्दीबाबत पुढील वर्षी विचारा, असे धोनीनेच माध्यमांना सांगितले होते.

त्यानंतर काही महिन्यांनी आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याच्या चेन्नई सुपरकिंग संघासह सरावाला सुरुवात केली व निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. अर्थात असे असले तरीही भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी धोनीची थेट निवड होणार नाही तर त्याला आयपीएलमध्ये आपली कामगिरी तसेच तंदुरुस्तीही सिद्ध करावी लागेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

धोनी, मंडळ, निवड समिती, कर्णधार तसेच मुख्य प्रशिक्षक यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली असून धोनीबाबत निर्णय घेण्यापूर्वी त्याची आयपीएलमधील कामगिरी कशी होते यावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.

धोनीच्या जागी संघात ऋषभ पंतला वारंवार संधी देण्यात आली. मात्र त्याला एकदाही संघासाठी यशस्वी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीकडेच चर्चा येऊन थांबतात. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा होत असून त्यासाठी जर धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आधी कामगिरी सिद्ध करावी अशी मंडळाची भूमिका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.