पुणे – खेळाडू असल्याचा खोटा दावा केलेल्या आणि नायब तहसीलदार पदावर निवड झालेल्या दोघांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कारवाई केली. या दोघांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे. “एमपीएससी’ने ट्विट करून ही माहिती दिली.
राज्यसेवा परीक्षा 2019 मधून अनिल बाबुराव पाटील, जयश्री गोविंद नाईक यांची नायब तहसीलदार पदावर निवड झाली होती. त्यांनी पात्र खेळाडू असल्याचा दावा केला होता. मात्र, एमपीएससीकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये त्यांनी खेळाडू असल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे एमपीएससीची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.