जामखेड – मतदारसंघात अडीच वर्षात विकास कामांची गंगा आणली. हजारो कोटीची कामे मंजूर केली. माझे विरोधक मी मंजूर केलेल्या कोट्यवधीच्या कामांना स्थगिती दिली असल्याचे सांगत आहे. स्थगिती दिलेले तेच कामे पुन्हा मंजूर केल्याचे भासवत आहेत. त्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीच्या कामांचे श्रेय घेऊ नये, असा इशारावजा सल्ला देत येथून पुढे विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याची ग्वाही आ. रोहित पवार यांनी दिली.
जवळा येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रसंगी आ.पवार बोलत होते. यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जवळा गावच्या सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच रोहिणी वाळूंजकर, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे, दीपक पाटील, काकासाहेब वाळूंजकर, शहाजी वाळूंजकर, अशोक पठाडे, युवा उद्योजक रणजीत पाटील, सुनील उबाळे, नय्युम शेख, प्रदीप दळवी, विष्णू हजारे, किरण रोडे, रघुनाथ मते, भाऊसाहेब कसरे, राहुल हजारे, इरफान पठाण, अक्षय वाळूंजकर आदी उपस्थित होते.
आ पवार म्हणाले, जवळा येथील 20 कोटींच्या ज जीवन योजनेच्या सुरुवातीला ही योजना पांढरेवाडी (ता.परंडा, जि.धाराशिव) येथून आणत असताना त्यासाठी सर्वे करावा लागला. दोन वेळा सर्वे केला, त्यात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींची पूर्तता करत ही योजना 20 कोटीपर्यंत गेली असून त्याला निधी उपलब्ध केला. ही योजना मंजूर करण्यासाठी यामध्ये दोन वर्षाचा कालावधी गेला आहे. त्यावेळेसचे सर्व सर्वे व इतर कागदपत्रे माझ्याकडे आहेत, त्यामुळे विरोधकांनी हवेत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा घणाघात केला.
पवार बोलत नाहीतर करून दाखवतात..
शेतकऱ्यांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी कारखाना चालवण्यास घेत होतो, परंतु राजकीय नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची अडचण सोडवायची होती म्हणून तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखाना घेतला आहे. तालुक्यातील ऊस व कामगारांचा देखील याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांची अडचण होत असताना पवार कसे शांत राहणार म्हणून “शेवटी आम्ही पवार आहोत, बोलत नाहीतर करून दाखवता’, असे आ. पवार यांनी ठणकावून सांगितले.