आमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड

राजगुरूनगर (रामचंद्र  सोनवणे) – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून भात पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन,  कमी खर्चात घेण्यासाठी “यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक” खेड तालुक्यात खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या डेहणे ता खेड येथील शेतीमध्ये आमदार मोहिते यांच्या हस्ते यंत्राद्वारे करण्यात आली.

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना नेहमीच राजकारण करताना भाषणे आणि जनतेची कामे करताना नागरिकांनी अनुभवले आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून आमदार दिलीप मोहिते पाटील हे तालुक्यातील डेहणे या गावात भात शेती करतात. आधुनिक पद्धतीने भात शेती करून परिसरातील शेतकऱ्याना आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. चारसूत्री पद्धतीने त्यांच्या शेतात गेली अनेक वर्षांपासून भात शेती केली जात आहे.

शेतकऱ्यांचा वेळ वाचावा, मजुरीचे पैसे वाचावेत, आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकरी पुणे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व मोहिंद्रा कंपनी यांच्या माध्यमातून “यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक” कार्यक्रम जिल्हाभर घेतला जात आहे.

डेहणे ता खेड येथे या यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रमाची सुरुवात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती अरुण चांभारे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, खेड बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे, डेहणेचे सरपंच दत्ता खाडे, उपसरपंच शंकर कोरडे, जिल्हा दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, देखरेख संघाचे शामराव वाळुंज, खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास माठे, अनिल सोळसे, मंडल कृषी अधिकरी नंदू वाणी, कृषी पर्यवेक्षक प्रकाश पवार, कृषी सहाय्यक दिगंबर नाईकरे, संतोष रोडे, मधुकर लाडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

पश्चिम भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात लागवड करताना पाऊस असल्याने शेतकऱ्यांना त्रास होतो. अनेक शेतात बैलांच्या द्वारे भात लावण्यासाठी गाळ केला जातो मात्र तो करताना शेतकरी आणि बैल यांचा मोठे कष्ट घ्यावे लागतात. भात लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती , शेती यंत्र, जास्त उप्तन्न देणारे बी बियाणे खते औषधे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले,शेतकऱयांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. भात लावणी काढणी करण्यासाठी कृषी विभागाने यंत्र उपलब्ध केली आहेत. त्याचा वापर आणि तंत्रयुक्त शेती केल्यास जास्त उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक शेती करावी. त्याभागातील शेतकऱ्यांना कायमच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, कोरडा ओला दुष्काळ यातून त्याची सुटका होत नाही. या संकटांचा सामना करण्यासाठी आधुनिक व यंत्र शेती फायद्याची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.