‘मिस्टर इंडिया’ मनोज पाटीलचा विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोट सापडली

मुंबई – मिस्टर इंडिया मनोज पाटील याने बुधवारी रात्री विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर कपूर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदरा असल्याचे लिहिले आहे. ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली असून साहिल खानला शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

मनोज पाटीलने सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे की, गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं मनोज पाटीलने म्हटलंय. आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचं मनोज पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल असंही त्याने म्हटलं आहे. या सर्व गोष्टींचा आपल्या कुटुंबियांना त्रास होत असून साहिल खानवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मनोज पाटीलने पोलिसांना केली आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खानने 2001 साली ‘स्टाइल’ या सिनेमात काम केले आहे. त्यानंतर 2010 साली ‘रामा: द सेवियर’ चित्रपटात तनुश्री दत्ता, द ग्रेट खली यांच्यासोबत काम केले. बॉलिवूड सोडल्यानंतर त्याने गोव्यात ‘मसल्स अँड बीच’ नावाची जिम सुरू केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.