आयुष्याच्या सरत्या शेवटी पुन्हा बांधली लग्नगाठ; त्याचे कारणही आहे खास

अनोख्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

सांगली – आयुष्याच्या सरत्या शेवटी वृद्धापकाळात पती-पत्नीचा एकमेकांना आधार असतो. म्हणूनच मिरजेत एक अनोखा लग्नसोहळा पार पडला आहे. येथे 69 वर्षांची वधू आणि 79 वर्षांचे वर बोहल्यावर चढले आहेत. आयुष्याच्या सरते शेवटी एकमेकांना आधार मिळावा यासाठी हा विवाह सोहळा पार पडला आहे. निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्न गाठ बांधली.

सविस्तर माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे (वय 79) यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. पण तो त्याच्या प्रपंचात व्यस्त असतो. त्यामुळे दादासाहेब साळुंखे यांना आपल्या जेवणाची तसेच इतरही कारणांसाठी खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे एकाकी जीवन जगणाऱ्या साळुंखे आजोबांनी आयुष्याच्या सरतेशेवटी कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा आधार असावा यासाठी आजोबांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी त्यांनी मुलाची संमती मिळवली. वयाच्या 79 व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यावेळी साळुंखे यांना मिरजेतल्या महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्राची माहिती मिळाली, ज्या ठिकाणी निराधार महिलांचा सांभाळ केला जातो. तिथे साळुंखे यांना जीवनाची सोबती सापडली.

आस्था बेघर केंद्राच्या प्रमुख शेख यांनी दादासाहेब साळुंखे यांच्याकडून त्यांचे विचार आणि मत जाणून घेऊन केंद्रातील निराधार शालिनी या 69 वर्षीय महिलेची गाठ घालून दिली. दोघांचे विचार जुळले. त्यानंतर त्यांनी उरलेले आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याचे ठरवले. निराधार असलेल्या शालिनी आणि सोबतीची गरज असणारे दादासाहेब साळुंखे हे दोघेही विवाहबद्द झाले आहेत. आस्था बेघर केंद्रामध्ये मोठ्या आनंदात हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. आजी-आजोबांच्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.