नागपूर – मी बीडची लेक आहे. मला बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर आनंद झाला असता, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. मी पाच वर्ष बीडची पालकमंत्री होते. त्यावेळी बीडचा चांगला विकास झाला होता. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता, असेही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे सोमवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात बीडचे पालकमंत्रीपद न मिळाण्याची सल असल्याचे दिसत आहे.
माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झालाय, त्यावर कुठलीही असहमती न दर्शवता, जे आपल्याला मिळाले आहे, त्यात जास्तीत जास्त चांगले काम करण्याच्या भूमिकेत मी असल्याचेही पंकजा म्हणाल्या.
अजितदादा सहकार्य करतील हा विश्वास –
बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत. ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
मिळालेल्या पालकमंत्रीपदावर मी सुखी –
बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यात मी सुखी आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव आहे, असे समजून मी पुढे वाटचाल करत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सारखे काम करायला मिळेल असे नाही. तर मी पूर्वी पाच वर्षे कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केले, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.