मुंबई – महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचा सर्व्हर मंगळवारी हॅक करण्यात आला. या हॅकर्सनी 500 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त टेक्नोबग या वेबसाईटने दिले आहे. सर्व्हर हॅक झाल्यानंतर सर्व 16 विभागीय कार्यालयांची यंत्रणा कोलमडून गेली. जर रक्कम दिली नाही तर सर्व माहिती डिलीट करण्याची आणि सर्व्हर नष्ट करण्याची धमकी या हॅकर्सनी दिली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
एमआयडीसीच्या संबंधित सर्व माहिती, सरकारी सहभाग, उद्योजक आणि सर्व औद्यागिक वसाहतीं सदर्भातील माहिती या ऑनलाईन सिस्टिमवर उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून एमआयडीसीचे कामकाज ठप्प आहे.
एमआयडीसीतील संगणक सुरू करताच त्यावर व्हायरस दिसत आहे. त्यामुळे संगणक सुरू केल्याने डाटाची हानी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एमआयडीसीने आपल्या सर्व कार्यालयांना संगणक सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील याची कोणतीही माहिती दुपारपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.