बीड – “आसरा म्हसोबाच्या नावानं चांगभलं”असा जयघोष करीत येथील सोनीजवळा (ता. केज, बीड) मधील ग्रामस्थांनी ग्रामदैवत म्हसोबा देवाचा उत्सव शोभेची दारू उडवत अतिशय उत्साही वातावरणात साजरा केला.
उत्सवाचे वैशिष्ट्य –
उत्सवापूर्वी दहा दिवस मंदिराच्या गाभाऱ्यात एक व्यक्ती संपूर्ण नऊ दिवस एका ठिकाणी बसून उपवास करतो, रात्री फक्त दूध, खारीक याचे सेवन केले जाते. तर दहाव्या दिवशी गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे पंधरा बैलगाड्या एकास एक जोडून त्याचे पूजन केले जाते. जी व्यक्ती नऊ दिवस एकाच ठिकाणी बसली आहे, त्या व्यक्तीच्या हस्ते सर्व गाड्यांची पूजा केली जाते.
प्रत्येक गाडीला एक नारळ चढवला जातो. त्यानंतर सदरील व्यक्ती ग्रामस्थांसमवेत गाड्यांना पाच फेऱ्या मारतात व त्यानंतर ती व्यक्ती पहिल्या गाडीला धरून संपूर्ण गाड्या त्यांच्यामार्फत ओढल्या जातात. हे अंतर सुमारे एक किलोमीटरचे असते. हा अचंबित करणारा क्षण पाहण्यासाठी विविध भागातून भाविक येत असतात.
यावर्षी रामदास गायकवाड यांना हा उपवासाचा मान मिळाला होता. सोनीजवळा म्हसोबा देवस्थान उत्सव समितीच्या वतीने आलेल्या सर्व म्हसोबा भक्तांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच नवनिर्वाचित सरपंच गोविंद बापू ससाणे यांनी देखील यात्रेकरिता आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत केले. यावेळी शंकर बाबुराव पाखरे, बळीराम मुकुंदा पाखरे, तुकाराम मुकुंदा पाखरे, राजाभाऊ शंभू पाखरे, अश्रुबा पाखरे, बाबासाहेब पाखरे, जालिंदर पाखरे, सचिन संदिपान पाखरे, सोपान पाखरे, महादेव पाखरे, एडवोकेट माने आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलग दोन दिवस चालणाऱ्या या म्हसोबा उत्सवात सायंकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा सलग दोन दिवस शोभेची दारू उडवून उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात भरविण्यात आला होता. गेली अनेक वर्षांपासून ही उत्सवाची परंपरा सुरु आहे.