सॅन दिएगो – अमेरिकेत ट्रम्प प्रशासन सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केली. त्यावेळी सीमाभागात अनेक बालकांची व त्यांच्या पालकांची ताटातूट झाल्याचा प्रकार घडला आहे.
त्यातील 545 बालकांचे आईवडील अजून सापडलेले नाहीत, अशी माहिती कोर्टाने नियुक्ती केलेल्या वकिलाने आज येथील एका कोर्टापुढील सुनावणीसाठी सांगितले. ही मुले सध्या अमेरिकन प्रशासनाच्याच देखरेखीखाली आहेत.
1 जुलै 2017 ते 26 जुलै 2018 या अवधीत ही मुले त्यांच्या आईवडिलांपासून तुटली. या बालकांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्याची सूचना कोर्टाने केली होती. या अवधीत एकूण 2700 मुले त्यांच्या आईवडिलांपासून दुरावली होती. तथापि, ही 545 बालके वगळता बाकीच्या मुलांच्या पालकांना शोधून काढण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. अन्य पालकांच्या शोधात आम्हाला यश आले नाही असे संबंधितांनी सांगितले.
या मुलांचे पालक आपल्या मूळ देशात म्हणजे मेक्सिको किंवा अन्य देशांत परतले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या देशांमध्ये या पालकांचा शोध घेतला जात होता, पण हे काम ही आता करोनामुळे थांबले आहे.
स्पेनमध्ये अशा मुलांच्या पालकांसाठी टोल फ्री नंबरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.