कोट्याधीश खासदारात सर्वाधिक खासदार भाजपाचे

नवी दिल्ली – निवडून आलेल्या 542 खासदारांपैकी 233 खासदारांवर गुन्हे नोंद आहेत. तर 475 खासदार कोट्याधीश आहेत. यातील 301 कोट्यधीश खासदार भाजपचे आहेत. कॉंग्रेसचे खासदार नकुलनाथ हे सर्वात श्रीमंत खासदार असून त्यांच्या नावावर 660 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

नव्या संसदेत मागील वेळेपेक्षा अधिक प्रमाणात महिला पोहोचल्या आहेत. पहिल्यांदाच 76 महिला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2014 मध्ये महिला खासदारांची संख्या 61 इतकी होती.

यंदा 21 ते 40 वर्षांदरम्यान वय असलेले 59 खासदार लोकसभेत असणार आहेत. बेंगळूर दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले तेजस्वी सूर्या (28 वर्षे) भाजपचे सर्वात कमी वयाचे खासदार ठरले आहेत. सूर्या यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना 3 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. दुसरीकडे यंदाच्या संसदेत मागील वेळेपेक्षा अधिक शिक्षित खासदार आहेत. 225 खासदार पदवीधर असून केवळ 7 लोकप्रतिनिधी 5 वीपेक्षा कमी शिकलेले आहेत.

ओडिशाची अभियांत्रिकी पदवीधर चंद्राणी मुर्मू (25 वर्षे 11 महिने वय) हिने 17 व्या लोकसभेतील सर्वात कमी वयाची खासदार होण्याचा मान मिळविला आहे. तिने राज्याच्या आदिवासीबहुल क्‍योंझर मतदारसंघात बीजदतर्फे निवडणूक लढवत दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या अनंत नायक यांचा 66203 मतांनी पराभव केला आहे.

चंद्राणी लोकसभेत आतापर्यंतची सर्वात कमी वयाची खासदार ठरणार आहे. 16 जुलै रोजी तिचा वाढदिवस असून त्यापूर्वीच ती लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ शकते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×