नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबर किंवा त्यापूर्वीपासून सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये सुरु करताना करोना विषयक सर्व खबरदारीच्या उपाय योजनांची अमंलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
करोनामुळं मार्चपासून देशातील सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये बंद करण्यात आली होती. केद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी नॉन-कोविड बेडची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यासाठी गृह मंत्रालयाकडून परवानगी घेतली आहे. केंद्रीय वैद्यकीय आयोगाकडे वैद्यकीय अभ्यासक्रमांना शिकणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी 2020 मधील इंटर्न विद्यार्थ्यांचे क्लिनीकल ट्रेनिंग पूर्ण झाले नाही तर आगामी काळात होणाऱ्या पदव्युत्तर नीट परीक्षेला पात्र ठरणार नसल्याचे कळवले होते. 2021-22 मधील पदव्युत्तर नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील नवे सत्र 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरु होणार आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2020-21 मधील सत्र 1 जुलै 2021 पासून सुरु करण्यासाठी पीजी-नीट परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरु केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन-कोविड बेडची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्याना क्लिनीकल ट्रेनिंग पूर्ण करता येणार आहे.