मुंबई – राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचे बारसे करण्यात आले आहे. त्यांना इंग्रजी नावे देण्यात आल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली आहे. तर हत्तीच्या पिल्लाचं चंपा आणि माकडाचं नाव चिवा ठेवू, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ, आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेऊ, असं सांगतानाच केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा असा सल्लाही महापौरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
आमच्या मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की पोटदुखी काय आहे? टीका करून फक्त चमकायच असतं, अशी टीकाही त्यांनी केली. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो. मग ऑस्कर नाव का नाही? यांच्या टीकेला आता कधीच उत्तर देणार नाही, असं त्या म्हणाल्या.
माझं मूळ गाव आणि सासर गोवा आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मी आज गोव्यात जाणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केली अशी टीका करत आहेत. किमान विकासाची कामं करत आहोत हे विरोधक मान्य करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.