गतवेळी मावळ लोकसभा निवडणुकीत 13 उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक पसंती

-‘नोटा’चा वापर वाढतोय

-यंदाच्या निवडणुकीतील मतांकडे लक्ष

पिंपरी – देशभरात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये “नोटा’च्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत येत आहे. गतवेळी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहाव्या क्रमांकाची मते “नोटा’च्या पर्यायाने घेतली होती. 19 उमेदवारांमध्ये प्रमुख तीन उमेदवारांसह आम आदमी पक्षाच्या मारुती भापकर आणि जेडीयुच्या श्रीरंग बारणे यांना नोटापेक्षा अधिक मते मिळाली होती. आता होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नोटाच्या पर्यायाचा किती मतदार वापर करतात याकडे लक्ष लागले आहे.

सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. सर्वाधिक मते नोटाला पडल्यास त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्याची तरतूद आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जावू लागला आहे. गतवेळी मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी विजय मिळविला होता. तर दुसऱ्या स्थानी शेकापचे लक्ष्मण जगताप होते. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे राहूल नार्वेकर हे होते.

नोटा म्हणजे काय?

“नोटा’ म्हणजे “None Of The Above’ (या पैकी कोणीही नाही). जर ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार मतदारांना पसंद नसेल तर ते नोटाला मत देऊ शकतात. त्यासाठी इव्हीएम मशीनवर सर्वात खाली नोटाचा पर्याय दिलेला असतो. नोटाचे बटन दाबले तर निवडणुकीत उभे असलेल्या एकाही उमेदवाराला मत मिळत नाही.

मारुती भापकर यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवित त्यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळविली होती. तर नाम साधम्याचा फायदा आपल्या उमेदवाराला व्हावा या हेतूने श्रीरंग बारणे यांचे नामसाधर्म्य असलेले श्रीरंग चिमाजी बारणे हे जनता दल युनायटेडच्या तिकीटावर निवडणुकीत उभे होते. त्यांना पाचव्या क्रमांकाची म्हणजेच 11 हजार 259 मते मिळाली होती. त्या पाठोपाठ 11 हजार 186 इतकी मते नोटाच्या पर्यायाला मिळाली होती. म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघातील एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाला मतदान केले होते.

गतवेळी लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार आपले नशीब अजमावित होते. त्यातील तब्बल 14 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मतदान मिळाले होते. त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे घरत संतोष रोहीदास, अपक्ष जगताप लक्ष्मण सितारा, मनवेल सबीनो डिसुजा, ननावरे प्रमोद महादेव, सुभाष गोपाळराव बोधे, भीमराव अण्णा कडाले, वैशाली सुरेंद्र बोरडे, आर. के पाटील, निरंजन यासीन शेख, राजेंद्र मारुती काटे, सीमा धर्मांना मनिकडी, जगताप लक्ष्मण मुरलीधर, अभिजीत अनिल आपटे यांच्यासह प्रबुध्द रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाला कमी मतदान झाले होते. यावेळी होत असलेली लोकसभा निवडणूक चुरशीची होत आहे.

लोकसभेच्या मैदानात 21 उमेदवार आपले नशीब अजमावित असले तरी लढत तिरंगी होत आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि महायुतीत ही लढत होईल असे वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने लढत चुरशीची बनविली आहे. चुरशीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत नोटाचा पर्याय किती मतदार निवडणार आणि त्याचा फटका कोणत्या उमेदवारला बसणार हे 23 मे रोजीच कळणार असले तरी नोटाचा पर्याय किती मते घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.