जनजागृतीसाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरूच
मांजरी : कोरोना विषाणूची धास्ती रोखण्यासाठी पालिका हद्दीलगतची गावे आता सज्ज झाले आहेत. मांजरीत पहिल्याच टप्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने गावातील लोक याबाबत दक्ष झाले आहेत. येथील लोक अधिक गांभीर्याने या घटनेने पाहू लागले आहेत. देशभरात विशेषतः राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रुग्णांची काळजी व शुश्रूषा करण्यासाठी सर्वत्र आरोग्य यंत्रणा कार्यरत झालेली आहे. उपलब्ध साधनांद्वारे ही यंत्रणा दिवस रात्र परिश्रम घेत आहे.असाच आढावा मांजरी बुद्रुक या बफर झोन गावचा घेण्यात आला आहे.
परदेशवारी करून आलेल्या दोन प्रवाश्यांना मुबंई वरून पुण्यात आणलेला मांजरी बुद्रुक येथील वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची वार्ता वार्यासारखी मांजरीत पसरली ती तारीख होती १० मार्च तेव्हापासून आजपर्यंत गावांत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सर्वच स्तरावर कोरोना आजराबाबत दक्षता घेतली जात आहे.मात्र या सर्वांत दोन व्यक्ती त्या दिवसापासून आजही डोळ्यात तेल घालून प्रशासनाने जाहीर केलेल्या बफर झोन मांजरी बुद्रुक गावांत हजारो नागरिकांची दक्षता घेत आहेत.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले आणि ग्रामसेवक अनिल कुंभार यांनी आरोग्य विभाग,जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचे सर्वच सदस्य आणि कर्मचारी वर्गाच्या साथीने गावात आणि गावच्या वस्ती-वस्तीवर आणि कॉलनी- कॉलनीत जावून जनजागृती केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सरपंच शिवराज घुले म्हणाले की गावातील एक टुरिस्ट वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती १० मार्चला संध्याकाळी मिळाली,तशीच माहिती मी तहसीलदार आणि बीडीओ यांना दिली.तोपर्यंत गावतील आणि त्या वाहनचालकाच्या परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. मला नागरिकांचे वारंवार फोन सुरू आहे. मी तत्काळ गावात येऊन नागरिकांना जागृत केले व जमेल तसा धीर देण्याचा प्रयत्न केला.
११ मार्च म्हणजेच दुसऱ्या दिवशी सर्वत्र फिरून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले.१२ मार्चला सुमारे वीस हजार जनजागृती करणारे पत्रक गावात वाटप केले तसेच सहा वार्डात २० फ्लेक्स लावले. गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका व आशावर्ककर व ग्रामपंचायत कर्मचारी यांची मिटिंग घेऊन ३५ गट तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यादिवशी रात्री आठवाजेपर्यंत थांबून बिडीओ यांनी सुमारे अडीच हजार ग्रामस्थांशी संवाद साधला.१३ मार्चपासून मांजरी बुद्रुक गावात येणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.
२० आणि २१ मार्चला १४ – १४ तास सलग गावातील १०० ठिकाणी रिक्षातून फिरून स्वतः माईकवरून नागरिकांना जागरूक केले व जनजागृती केली.२२ ला शंभर टक्के जनता कर्फ्यु ला प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला.२४ मार्चला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार , गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, डॉ. सचिन खरात,जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, ग्रामसेवक अनिल कुंभार, सदस्य व आरोग्य कर्मचारी यांनी गावातील काही प्रातिनिधिक घरांना भेटी देऊन कुटुंबातील सदस्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.२४ मार्च पासून आजपर्यंत गावतील विविध भागात जाऊन ट्रॅक्टर घेऊन औषध फवारणी केली जात आहे.
नियमित कामे करण्याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी सकाळी आठ रात्री उशिरापर्यंत काम करतोय त्यात मला ग्रामसेवक,सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांची मदत होत असून नागरिकही सहकार्य करत आहेत. अजूनही धोका कायम आहे, परंतु गावात आता आम्ही चांगलीच दक्षता घेतली आहे.