गुढी पाडव्याला आंब्याचे दर ‘चढे’

पुणे – गुढी पाडव्यानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात आंब्यांची मोठी आवक होते. यंदाही आवक बऱ्यापैकी झाली आहे. मात्र यंदा आंब्यांचे दर चढे आहेत. चढ्या दरामुळे ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

“दरवर्षी पाडव्याला आंब्याच्या साडेचार ते पाच हजार पेट्यांची आवक होत असते. यंदा रत्नागिरीहून तीन हजार आंब्यांच्या पेट्या मार्केटयार्डातील फळबाजारात दाखल झाल्या,’ अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

आंबा महाग असल्याने किरकोळ खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. करोनाच्या संसर्गामुळे आंबा विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. ग्राहकांना घरपोच आंबे पोहचवण्याची व्यवस्था व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ग्राहकांनी मागणी केल्यास अगदी एक पेटी ग्राहकांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मार्केटयार्डातील घाऊक बाजारात तयार आंब्यांच्या (आकारमानानुसार) चार ते सहा डझनाच्या पेटीचा दर 3 ते 6 हजार रुपये एवढा आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांची विक्री प्रतवारीनुसार 800 ते 1500 रुपये या दराने केली जात आहे, असे मोरे यांनी सांगितले.

कलिंगड, खरबुजाची मोठी आवक
शहरात दोन दिवस टाळेबंदी लागू असल्याने मार्केटयार्ड दोन दिवस बंद होते. सोमवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. फळबाजारात कलिंगड, खरबुजाची मोठी आवक झाली. कलिंगड आणि खरबुजांना मागणीही चांगली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.