पंढरपूर – बाळूमामाचा शिष्य असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले बारामती पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयाने त्याच्या कोठडीत तीन दिवसाची वाढ केल्याने त्याचा जेल मधील मुक्काम वाढला आहे. मनोहर भोसलेच्या विरोधात अनेक पुरावे समोर येत आहेत. सरकारी पोर्टलवरून भक्तांची माहिती मिळवून भोसले तीच माहिती भविष्य म्हणून सांगायचा असा दावा क्रांतिकारी आवाज संघटनेचे मच्छिंद्र टिंगरे याने केला आहे.
टिंगरे यांनी केलेल्या दाव्यात म्हंटले आहे की, मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवून तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो. मनोहर भोसलेचे कार्यकर्ते लोकांकडून बाहेर महाराजांना भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो. भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जाते. दरम्यानच्या काळात माय रेशन या शासकीय पोर्टलमधून संपूर्ण कुटुंबाची माहिती काढून तीच माहिती भक्ताला सांगितली जाते, अशी हात चलाखी करून मनोहर भोसले भक्तांना उल्लू बनवत होता.
सोलापूर येथे दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील महिलेचे भविष्य सांगताना मनोहर भोसले याने त्या महिलेला तुझे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचे चिठ्ठीत लिहून दिले होते. यात बारामती शहरातील एका राजकीय नेत्याचे नावं टाकल्याने मनोहर भोसलेने बारामतीमध्ये स्वतःताच्या अडचणी वाढवून ठेवल्या आहेत.
मोनहरकडे एवढी प्रॉपर्टी आली कोठून?
मनोहर भोसले हा 2013पर्यंत झोपडीत राहत होता. आज त्याने पत्नीच्या नावावर 44 लाख रुपये किंमतीची 27 एकर जमीन, उंदरगाव येथे दीड एकर जमीन, एक हजार स्क्वेअर फूटचा बंगला, मठ, बारामती येथे मठ, एवढी संपत्ती कोठून आली असा प्रश्न क्रांतीकारी आवाज संघटनेने विचारला आहे.