मुंबई – राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावले उचलली आहेत. राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले असून राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.
अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई-पासची आवश्यकता असणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून राज्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. हे नियम 1 मे पर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
जाणून घ्या कसा काढावा ई-पास –
- ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
-
नंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करा.
-
त्यानंतर ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
-
नंतर आवश्यक कागदपत्र जोडावीत.
-
प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही तेथे नमूद करावे लागेल.
-
कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
-
अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करावा, त्यावरून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
-
पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
-
या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
-
प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
कोणत्या कारणासाठी मिळू शकतो पास –
-
अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
-
अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
-
कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
-
ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत केली जाईल.