Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचले होते. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी झाले.
महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना 230 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेंव्हापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून खल सुरु होता. भाजप पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे भाजपने म्हंटले. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते.
मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर महत्वाच्या विभाग वाटपाबाबत अनेकदा दिल्ली, मुंबईत बैठका झाल्या मात्र अखेरपर्यंत भाजपने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची मागणी पूर्ण केली नाही. त्यानंतर शिंदे यांनी गृहमंत्री पदासाठी आग्रह धरला. मात्र ती मागणीदेखील शिंदे यांची पूर्ण करण्यात आली नाही. यादरम्यान शिंदे नाराज असल्याचे वेळोवेळी दिसून आहे. ते गावी गेले, आजारी पडले, पुन्हा मुंबईत आले. पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का या प्रश्नाला संध्याकाळी सांगू असे म्हंटले. मात्र अखेर भाजपने त्यांची समजूत काढली आणि आज अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शपथविधी समारंभादरम्यान एक गोष्ट जाणवली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर सतत हसून होते. तर शिंदे यांच्या चेहऱ्यावर आजही नाराजी दिसत होती. एकंदरीत फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू समारंभ होईपर्यंत गेले नाही आणि शिंदेंच्या आले नाही.