एल अँड टी विरुद्ध माइंडट्री अस्तित्वाचा लढा देणार

कंपनीवर कब्जा न करण्याचे माइंडट्रीच्या प्रवर्तकांचे आवाहन

बंगळुरू – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील छोटी कंपनी माइंडट्री आपले नियंत्रण एल अँड टी कडे देण्याला प्रखर विरोध करीत आहे. कंपनी शेवटपर्यंत प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे माइंडट्रीच्या प्रवर्तकांनी स्पष्ट केले आहे.

एल अँड टी मोठी कंपनी आहे. या कंपनीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या दोन शाखा आहेत. या शाखा त्यांनी वाढवाव्यात किंवा गरज नवी कंपनी स्थापन करावी. छोट्या कंपनीवर कब्जा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. त्यामुळे स्टार्टअपस संदर्भात भारतात नकारात्मक वातावरण तयार होईल, असे माइंडट्री कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णकुमार नटराजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जर माइंडट्री कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कब्जा घेण्याच्या प्रक्रियेला विरोध केला तर काय होईल असा सवाल नटराजन यांनी केला. एल अँड टी कंपनीचा महसूल 1,20,000 कोटी रुपये इतका आहे. जोकी माइंडट्री कंपनीच्या महसुलापेक्षा अठरा पटीने जास्त आहे. त्यामुळे तुम्ही नवी कंपनी स्थापन करा व माइंडट्रीच्या कब्जा घेण्याचा प्रयत्न करू नका, असा आग्रह त्यांनी केला आहे.

जर असे झाले तर माइंड ट्री कंपनीच्या मूल्याची वाताहत होईल. भागधारक आणि कर्मचाऱ्यावर नकारात्मक परिणाम होईल. यावेळी माइंड ट्री कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची, रोस्तोव रावण, पार्थसारथी उपस्थित होते. आम्हाला सरकार आणि इतर कंपन्यांनीही मदत करून हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करावा. आम्ही एक नवी कंपनी नव्या मोहिमेच्या आधारावर सुरू केली आहे. तुम्ही केवळ याचे पैशात मूल्यांकन करू नका, असे नटराजन यांनी सांगितले आहे.

एल अँड टी कंपनीने कंपनीचे भागभांडवल 10800 कोटी रुपयांना विकत घेण्याचा आक्रमक प्रस्ताव ठेवला आहे. भारतात प्रथमच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे नव्या छोट्या कंपन्या मोठी स्वप्न घेऊन काम करीत आहेत. जर एल अँड टीने माइंडट्रीवर कब्जा केला तर इतर कंपन्यांचे मनोधैर्य खच्ची होणार आहे.

माइंडट्री कंपनीचे वीस टक्के इतके भाग भांडवल बी जी सिद्धार्थ यांच्याकडे होते. एल अँड टीने हे भागभांडवल विकत घेण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर एल अँड टी आणखी 15 टक्के भागभांडवल खुल्या बाजारातून घेण्याच्या मनःस्थितीत आहे.

दरम्यान, माइंडट्रीच्या संचालकांची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत शेअरच्या बायबॅकच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. यावर एल अँड टी कंपनीने म्हटले आहे की, माइंडट्री आमच्या नियंत्रणात आली तरी आम्ही तिचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवू. त्याचबरोबर ही कंपनी या क्षेत्रात आगेकूच करेल याची काळजी घेणार आहोत. गेल्या एक आठवड्यापासून या घडामोडींकडे माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचा या कंपन्याच्या शेअरच्या भावावर परिणाम होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.