कॉंग्रेस तमिळनाडूत 9 तर अद्रमुक 30 जागा लढणार

युती-आघाड्यांसाठी जमवाजमवीला वेग

चेन्नई – तमिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या 40 लोकसभा मतदारसंघांकरता कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यात आघाडी होणार आहे.
दोन्ही पक्षांदरम्यान आघाडीबद्दल सहमती झाली आहे. या आघाडी अंतर्गत तमिळनाडूत द्रमुक 30 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर कॉंग्रेसला तमिळनाडूच्या 9 तर पुडुचेरीतील एकमात्र जागा मिळाली आहे. आघाडी स्थापन करण्याकरता द्रमुक नेत्या कनिमोळी आणि तमिळनाडू कॉंग्रेस अध्यक्ष के.एस. अलागिरी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

द्रमुकने मागील लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या सर्व 39 जागा स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्या निवडणुकीत कॉंग्रेस तसेच द्रमुकला एकही जागा जिंकता आली नव्हती. मागील निवडणुकीत करुणानिधींनी डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह अलायन्स स्थापन करून स्थानिक पक्षांना एकत्र आणले होते. यात व्हीसीके, एमएमके, आययुएमएल आणि पुथिया तामीझागम यांचा समावेश होता.

भाजपशासित रालोआ आणि अण्णाद्रमुकच्या नेत्यांची गेल्या आठवड्यात बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर अण्णाद्रमुकने अधिकृतपणे रालोआत प्रवेश केला आहे. तमिळनाडूत आता भाजप, अण्णाद्रमुक आणि पीएमके हे पक्ष एकत्र येत लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. भाजपला 5 तर अण्णाद्रमुकला 27 आणि पीएमकेला 7 मतदारसंघ मिळणार आहेत.

भाजप-अण्णाद्रमुक आघाडीपूर्वी मंगळवारीच अण्णाद्रमुक आणि पीएमके यांच्यात सहमती झाली होती. मागील लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने 39 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या. आघाडीच्या अटींनुसार भाजपला राज्याच्या 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत अण्णाद्रमुकला समर्थन द्यावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.