पाटणा – सध्या तुरूंगवास भोगत असणारे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सोमवारी त्यांचे पुत्र तेजस्वी यांचे 31 व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. बिहारची जनता तुला उद्या (निकालाचा दिवस) बर्थ डे गिफ्ट देईल, असा आशीर्वाद लालूंनी मुलाला दिला.
विरोधकांच्या महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यांनी निकालाच्या आदल्या दिवशी आलेला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. त्यांनी सोमवार सुरू होण्याआधी रात्री 12 च्या सुमारास लालूंच्या मदतनीसाकडे असलेल्या मोबाईल दूरध्वनीवरून वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी लालू झोपी गेले होते.
त्यानंतर सकाळी 6 वाजता तेजस्वी यांनी पुन्हा फोन लावला. तोपर्यंत लालू झोपेतून जागे झालेले नव्हते. जाग आल्यानंतर लालूंनी तातडीने तेजस्वी यांच्याशी संपर्क साधून महाआघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आल्याने लालूंना रांचीमधील तुरूंगात ठेवण्यात आले.
काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना रांचीमधील रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यांनी ट्विटरवरून तेजस्वी यांना शुभेच्छा देताना हॅप्पी बर्थ डे-सीएम (मुख्यमंत्री) असा उल्लेख केला.