कोल्हापूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रकाशित केल्याबद्दल फडके बुक हाऊसला शिवाजी विद्यापीठाने संबंधित पुस्तकांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. फडके बुक हाऊसने परवानगी न घेता शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख पुस्तक प्रकाशनामध्ये केला होता. यावरुनही विद्यापीठ प्रशासनाने फडके बुक हाऊसला कडक समज दिली आहे. ‘शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली व आक्षेपार्ह मजकुराची सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. विक्री तत्काळ थांबवावी’असे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी कळविले आहे.
फडके बुक हाऊसतर्फे प्रकाशित ‘ बीए भाग ३ सेमिस्टर पाच ‘मराठयांचा इतिहास’ या व इतर दोन विषयाच्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी निदर्शनास आणला होता. रुपेश पाटील यांनी बुक हाऊसच्या व्यवस्थापनची भेट घेऊन याप्रश्नी जाब विचारला. यावेळी व्यवस्थापनने माफीनामा लिहून दिला होता. दुसरीकडे पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेऊन त्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी फडके बुक हाऊसला तत्काळ पत्र पाठविले आहे.
त्यामध्ये म्हटल आहे, ‘फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छपाई केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. समाजात तेढ निर्माण होवून असंतोष पसरण्याची शक्यता आहे. पुस्तक प्रकाशनामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा उपयोग करण्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही. तेव्हा विद्यापीठाची नावे असलेली व आक्षेपार्ह मजकुराची सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत, विक्री थांबवावी. येथून पुढे शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर करुन महापुरुषांची बदनामी होईल असा कोणताही मजकूर छपाई करण्यात येणार नाही याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. आणि यासंबंधी केलेली कार्यवाही विद्यापीठ कार्यालयास कळवावी.’