न्यूयॉर्क : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किंम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहे. हे वृत्त देणारे अमेरिकेतील वाहिनीवरही त्यांनी उपरोधिकपणे टीका केली. अर्थात डोनाल्ड ट्रम्प आणि संबंधित वाहिनी यांच्यात सातत्याने वादविवाद होत असल्याचे दिसून आले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी किंम जोंग विषयी मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी, मला असं वाटते आहे की ते वृत्त चुकीचे आहे. सध्यातरी मी एवढेच सांगू शकेन. त्या वाहिनीने जुन्या रिपोर्टच्या आधारे ते वृत्त दिले, असे मला समजले असल्याचे त्यांनी म्हटले.
अर्थात किम जोंग उन यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबद्दल थेटपणे काही माहिती आहे का, याबद्दल कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वाहिनीवरील ते वृत्त खोटे असल्याचाही आरोप यावेळी केला. या वाहिनीच्या पत्रकाराला पुढे कोणताही प्रश्न विचारू देण्यास त्यांनी नकार दिला.
किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले होते. किम जोंग उन यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे या वाहिनीच्या वृत्तात म्हटले होते. अर्थात या वृत्ताचे स्रोत कोण आहेत, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते.