खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छूकांची कोंडी 

पुणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी 8 जण इच्छूक होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी ऐन मुलाखती वेळी सूचना करत मतदारसंघातून केवळ तीनच जणांची नावे सर्वानुमते देण्याची सूचना केल्याने या मतदारसंघातील इतर पाच इच्छूकांची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर सर्वानुमते, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे आणि नगरसेवक सचिन दोडके यांची नावे देण्यात आली, तसेच या सर्वांनी मुलाखतीही दिल्या. मात्र, इतर सात मतदारसंघातील इच्छूकांचे एकमत न झाल्याने त्यां सर्वांनी मुलाखती दिल्या. त्यात माजी महापौर तसेच पक्षाचे पदाधिकारी राहिलेल्या इच्छूकांची संख्या लक्षणीय होती. तर मुलाखती असलेल्या उमेदवारांनीही यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या आठ विधानसभा मतदारासंघातील इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह, शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रत्येकच मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मतदारसंघातील इच्छूकांना एकत्र बसून प्रत्येकी 3 नावे सुचविण्याच्या सूचना केल्या.   खडकवासला मतदारसंघतील आठही इच्छूकांच्या मुलाखती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यांनी या सर्वांना तुम्ही एकत्र बसून एक नाव निश्‍चित केले तर चांगले होईल तसेच एक नाव निश्‍चित होत नसेल तर तीन नावे निश्‍चित करावी अशा सूचना केल्या. त्यानंतर हे सर्व इच्छूक एकत्र बसून त्यांनी ही तीन नावे निश्‍चिय केली.

खडकवासला मतदारासंघातून महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, काका चव्हाण, विकास कामटे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आणि त्र्यंबक मोकाशे यांनी एकत्र बैठक घेऊन महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे आणि नगरसेवक सचिन दोडके यांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे दिली.

हडपसर मतदारसंघातूनही सर्वाधिक 14 जणांनी मुलाखती दिल्या असून त्यात माजी महापौर, तसेच नगरसेवकांचा समावेश आहे. तर वडगाव शेरीतून सुनील टिंगरे आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुलाखत दिली असून 2014 मध्ये टिंगरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती तर महापालिका निवडणूकीत ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात या दोन्ही नेत्यांमध्येच चुरस आहे.तर इतर मतदारसंघातूनही पक्षाचे आजी-माजी नगरसेवक इच्छूक असून त्यांनी मुलाखती दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)