पुणे – कात्रज दुध डेअरीने ग्राहकांची आवड लक्षात घेऊन दरवेळी नाविण्यापूर्ण दुग्धजन्य उत्पादने बाजारात दाखल केली आहेत. ही ुत्पादने ग्राहकांच्या पसंतीस पडत असून त्याच्याखरेदीसाठी सणासुदीला ग्राहकांची झुंबड उडत आहे. यावर्षी गणेशोत्सव व दिपावली मध्ये कात्रज दुध डेअरीच्या मिठाई विक्रीत मोठी वाढ झाली.
गणेशोत्सवामध्ये सुमारे 21 टन मोदक व पेढे व मिठाईची विक्री झाली असून दसरा सणाचे वेळी 8 टन मिठाई व 9.5 टन श्रीखंड/आम्रखंड तर दिपावलीमध्ये 21 टन मिक्स मिठाईची विक्री झालेली आहे. संघाची सर्व उत्पादने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. डेअरीच्या उत्पादनाची ईस्विगी/झोमॅटो या कंपन्यांमार्फत ऑनलाईन विक्री सुरू करणेत आलेली आहे.
आंबा बर्फी, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, काजू कतली, पेरू आईस्क्रिम, ब्लॅक करंट आईस्क्रिम, राजभोग आईस्क्रिम, पॉलिथिन पॅकिंग दही, बाटलीबंद ताक असे विविध नविन दुग्धजन्य पदार्थ सुरु करण्यात आलेले आहेत.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (कात्रज डेअरी) 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर आज दि. 23/12/2020 रोजी दुपारी 1.00 वा. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ असल्याची माहितर व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक हिं. क्षीरसागर यांनी दिली.
सभेच्या सुरुवातीस संघाचे चेअरमन विष्णू ध. हिंगे यांनी संघाचे 2019-20 या आर्थिक वर्षातील संघाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली. संघास सन 2019-20 या आर्थिक वर्षात रु. 2,48,85,700/- इतका निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लि. रु.1/- प्रमाणे एकूण सुमारे रु.6.94 कोटी दोन टप्प्यात देणेत येणार असून पैकी प्रति लि. 50 पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली असून उर्वरीत रक्कम मार्च 2021 पूर्वी अदा केली जाणार आहे.
सभेमध्ये 218 संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या सभेमध्ये कैलास तांबडे, मनिष मोरडे. लक्ष्मणराव मुके, अजित पवार, नाना वरे, किरण मांजरे, किशोर तांबे या संस्था प्रतिनिधींनी आपली मते मांडली. या सभेस एनडीडीबी मुंबईचे रिजनल हेड अनिल हातेकर उपस्थित होते. तसेच संघाचे जेष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के यांनी आभार मानले.
दूध खरेदी दरात 1 जानेवारी 2021 पासून गाय दूधासाठी प्रति लि. 1/-, म्हैस दूधासाठी प्रति लि. 2/- वाढ करण्याचा निर्णय मा. संचालक मंडळाने घेतलेला आहे.