पुणे – कसबा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरण्याची शक्यता आहे. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीत दोन्ही निवडणुका पक्षाने लढविल्या पाहिजेत, असा सूर उमटला आहे. त्यानुसार ही बाब पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळविण्यात येणार असल्याचे मनसे नेते बाबू वागसकर यांनी स्पष्ट केले. तसेच अंतिम निर्णय पक्षाध्यक्षच घेतील असेही ते म्हणाले.
कसबा मतदारसंघात 2007 व 2012 मध्ये पालिका निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. त्यामुळे या भागात पक्षाची ताकद असून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही केली आहे.
त्यानुसार पक्षाध्यक्ष ठाकरे यांना कार्यकर्त्याच्या भावना कळविण्यात येणार असून लवकरच या दोन्ही ठिकाणी मेळावे घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे यांच्यासह कोअर कमिटी सदस्य या बैठकीस उपस्थित होते.