कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन आणखी मजबूत करणार
गुना – लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून माजी खासदार आणि ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव झाला. गुना या मतदारसंघावर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जबरदस्त प्रभाव होता. तिथली जनताही त्यांना आदरभाव देत असते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच ज्योतिरादित्य सिंधिया गुनामध्ये पोहोचले आणि त्यांनी जिल्हा कॉंग्रेस कमिटीची बैठकही घेतली.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना ते म्हणाले, माझ्या पराभवाला मीच जबाबदार आहे. मी मतदारसंघात मेहनत करण्यास कमी पडलो, म्हणूनच माझा पराभव झाला. मी पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी गुनामध्ये आलो आहे. लवकरच कार्यकर्त्यांचे संघटन आणखी मजबूत केले जाईल.
मी पक्षाचा एक शिपाई आहे. सच्च्या शिपायासारखं मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंद खोलीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी तिथे मंत्री तुलसी सिलावट, इमरती देवी, कामगार मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया उपस्थित होते.