ओतूर – जुन्नर तालुक्यातील एका आदिवासी गावचे सरपंच यांची नुकतीच एका पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. त्यांच्या चाहत्यांनी जुन्नरमध्ये 115 फूट लांब व 22 फूट रुंदीचा शुभेच्छा बॅनर तयार केला आहे. या बॅनरवर राज्यातील नेत्यांसह, तालुक्यातील नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे साडेसहा हजारच्यावर फोटो लागलेले आहेत.
अवघ्या सव्वाशे फुटात ही साडेसहा हजार माणसे डिझाइन तयार करणाऱ्या पठ्ठ्याने केवळ एका बॅनरवर बसवली आहेत. बॅनरवर एवढे फोटो असतील तर याची चर्चा ही होणारच! या बॅनरवर एवढ्या मोठ्या फोटोंच्या गर्दीत आपणही कोठे आहोत का, हे पाहण्यासाठीही वेगळी गर्दी होत आहे हे निराळेच. काहीजण दिवस दिवस फोटोचा शोध घेत आहेत.
तर काही जण बॅनरचा फोटो आपल्या मोबाइलमध्ये घेऊन घरी जाऊन शोध घेत आहेत; मात्र बॅनरवर जेवढा फोटो स्पष्ट दिसतो तो मोबाइलमध्ये दिसत नसल्याने पुन्हा आपला फोटो शोधण्यासाठी या ठिकाणी यावे लागत आहे. हा बॅनर येथे आणखी दहा दिवस राहणार असल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे हे दहाही दिवस आणि पुढे आणखी काही दिवस चर्चा मात्र रंगणारच आहे.
या सरपंचाचे वय अवघे 24 वर्षे असून अगदी कमी वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ते राजकारणात आले असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे वडिल हे शिवेसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत.
यापूर्वी जुन्नर तालुक्यात असाच 2000 फोटोंचा शुभेच्छा बॅनर लागला होता. त्याचीही मोठी चर्चा झाली. विशेष म्हणजे तो बॅनर याच सरपंचांचे वडील यांचा होता. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी दसरा मेळावा शुभेच्छाकरिता हा बॅनर लावण्यात आला. अशा वेगवेगळ्या फंड्यांमुळे हे पिता-पुत्र नेहमीच चर्चेत असतात.
आचार संहितेचे काय?
जुन्नर तालुक्यात सध्या 66 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. यात बॅनरवरील सरपंचाच्या भागातील काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येत्या 15 जानेवारीला येथे मतदान होत आहे. या निवडणुकीच्या काळात एवढा मोठा बॅनर लावणे आचारसंहितेत बसते का? अन् बसत नसेल तर निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता आहे.
याबाबत मी अनभिज्ञ आहे. रविवार असल्याकारणाने मी बाहेर असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन मी पाहील. यानंतर पुढे काय करायचे याचा निर्णयघेण्यात येईल.
-हनुमंत कोळेकर, तहसीलदार जुन्नर