जुन्नर – प्रवाशांची होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी जुन्नर बस स्थानकात गेल्या चार महिन्यांपूर्वी नव्याने स्वछतागृह उभारण्यात आले आहे. यासाठी अंदाजे 15 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला; मात्र ज्या कारणासाठी हे सुलभ शौचालय बांधले आहे, तो हेतू मात्र साध्य होताना आजतरी दिसत नाही.
नव्याने उभारलेल्या या स्वच्छता गृहाला ड्रेनेज लाईनच जोडली नसल्या कारणाने ते बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन शौचालयाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर पूर्णपणे दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठून डबके तयार झाले आहे. तर दुसरीकडे जुन्या स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
“असून अडचण, नसून खोळंबा’ अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. नवीन बांधलेले शौचालय प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करून होणारी कुचंबणा थांबवावी, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले. दरम्यान हे स्वच्छतागृह “ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुलभ इंटरनॅशनल या संस्थेस चालविण्यास दिले असल्याचे समजते. संबंधित व्यक्तीही हे काम लवकर पूर्ण करावे, याकरीता महामंडळाकडे हेलपाटे मारत असल्याचे समजते.
याबाबत जुन्नर बसस्थानक येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता लवकरच उर्वरित काम पूर्ण होऊन नवीन शौचालय प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.