येळकोट… येळकोट… जय मल्हार.., जेजुरीत भंडारा उधळून मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत

जेजुरी – घटस्थापनेपासून म्हणजे 7 ऑक्‍टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे व धर्मस्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 24) जाहीर केला आणि जेजुरीत श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, जेजुरी ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, सेवेकरी यांनी गडाच्या पहिल्या पायरीवर भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली.

मार्च 2020 मध्ये करोना फैलाव टाळण्यासाठी सरकारी निर्णयानुसार महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2020 रोजी निर्बंध घालत पुन्हा मंदिर खुले करण्यात आले होते. मात्र, करोनाची दुसरी लाट मार्च 2021 मध्ये सुरू झाली आणि 2 एप्रिल पासून देवदर्शन पुन्हा बंद करण्यात आले. शहराचे अर्थकारण येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक विधी व धर्मकारणावर अवलंबून असल्याने गेल्या दीड वर्षाच्या बंद काळात सर्व शहराची आर्थिक घडी विस्कटली आहे. कित्येक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काहींचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे.

गेल्या महिन्यात देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाबरोबर झालेल्या बैठकीत देवदर्शनासाठी काही निर्बध घालून मंदिरे सुरू करावीत अशी राज्यातील भाविकांची मागणी असून जेजुरी नगरीची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देत देवदर्शनासाठी मंदिरे खुली करावीत अशी विनंती विश्वस्त मंडळाने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने 7 ऑक्‍टोबर घटस्थापनेपासून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण जेजुरी शहरात आनंदाचे वातावरण पसरले.

मंदिरे सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करून आभार मानतो असे विश्वस्त शिवराज झगडे व संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, पर्यवेक्षक गणेश डीखळे, संतोष खोमणे, लेखापाल महेश नाणेकर, पुजारी रवींद्र बारभाई, महेश आगलावे, राहुल कटफळकर, सतीश कदम, ग्रामस्थ मंडळाचे संजय खोमणे, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष यशवंत दोडके, सुवर्णस्टार क्‍लबचे रजाक तांबोळी, विलास कड, देवसंस्थान कर्मचारी, पुजारी, खांदेकरी, सेवेकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.