ISL : प्रदिर्घ ब्रेकनंतर आजपासून पुन्हा आयएसएलचा थरार

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी घेतली होती विश्रांती

पुणे – हिरो इंडियन सुपर लिगला 40 दिवसांच्या प्रदिर्घ हिवाळी ब्रेकनंतर शुक्रवारी पुन्हा प्रारंभ होत आहे. त्यात बहुतेक संघांचे आव्हान पणास लागलेले असेल. देशाचे आशियाई करंडक स्पर्धेत प्रतिनिधीत्व केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या क्‍लबमध्ये परतले आहेत. त्या स्पर्धेत भारताची बाद फेरीतील आगेकूच थोडक्‍यात हुकली. आता हे खेळाडू या स्पर्धेतील मोहिम पुढे सुरु ठेवण्यासाठी आतूर असतील. त्यांच्यासाठी कमावण्यासारखे खूप काही असेल. शुक्रवारी कोचीतील नेहरू स्टेडियमवर एटीके आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात लढत होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेचा तिसरा टप्पा आता सुरु होईल. त्यातून प्ले-ऑफचे स्थान पटकावण्याची संधी असेल. बेंगळुरू एफसीचे पहिल्या चार संघांमधील स्थान जवळपास नक्की आहे, पण शर्यतीत असलेल्या इतर संघांबाबत असे म्हणता येणार नाही. मुंबई सिटी एफसी, जमशेदपूर एफसी, एफसी गोवा, एटीके आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी अशा पाच संघांमध्ये उरलेल्या तीन जागांसाठी चुरस आहे. दिर्घ ब्रेकमुळे या संघांना पुन्हा संघटित होण्यास वेळ मिळाला आहे. आता फॉर्म आणि लय हे निकष लागू होणार नाहीत. एक जानेवारी रोजी ट्रान्स्फर विंडो खुली झाली, जी महिनाअखेरपर्यंत सुरु राहील. त्याचा उपयोग अनेक संघांनी केला आहे.

एटीके, नॉर्थईस्ट व एफसी गोवा या संघांनी त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येकी दोन खेळाडूंना भरती केले आहे. या ब्रेकपूर्वी गोवा संघाची मोहिम काहीशी भरकटली. मागील चार सामन्यांतून त्यांना केवळ चार गुण मिळविता आले आहेत. ट्रान्स्फर विंडोदरम्यान त्यांनी मोरोक्कोचा स्ट्रायकर झैद क्रौच आणि गोलरक्षक नवीन कुमार यांना पाचारण केले. कामगिरी घसरणार नाही यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, नवीन परतल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. तो आमच्या खेळाची शैली ठाऊक असलेला खेळाडू आहे. गोलरक्षकाला शैलीची कल्पना असणे फार महत्त्वाचे ठरते.

झैद हा लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह्युगो बौमौस आणि अहमद जाहौह यांच्या साथीत खेळला आहे. त्याच्यामुळे लॉबेरा यांच्या आक्रमणातील ताकद आणखी वाढेल. फेरॅन कोरोमीनास आणि एदू बेदीया नसताना ही आघाडी फळी धडाडली नाही. नॉर्थईस्टने मोसमाला तुफानी प्रारंभ केला. त्यानंतर मात्र त्यांची कामगिरी भरकटली. गेल्या चार सामन्यांत त्यांना विजय मिळविता आलेला नाही. एफसी गोवाविरुद्ध 1-5 असा दारुण पराभव त्यांना पत्करावा लागला. फुल-बॅक शौविक घोष याला त्यांनी पाचारण केले आहे, तर आगुस्टीन ओक्राह जायबंदी झाल्यामुळे ग्रीक स्ट्रायकर पॅनागीओटीस ट्रीयाडीस याची निवड केली आहे.

नॉर्थइस्टला अद्याप एकदाही प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आलेला नाही. त्यामुळे एल्को शात्तोरी यांना यंदाची मोहिम भरकटू द्यायची नाही. अष्टपैलू घोष बचाव फळीतही खेळू शकतो. त्याच्या तसेच ट्रीयाडीसच्या निवडमीवरून नॉर्थइस्टने चुकांपासून बोध घेतल्याचे दिसून येते. एटीकेचा संघ गुणतक्त्‌यात सहावा आहे. नॉर्थइस्टपेक्षा ते चार गुणांनी मागे आहेत. आक्रमणात एटीकेला झगडावे लागले आहे. सर्व संघांमध्ये सर्वांत कमी गोल एटीकेचे आहेत. स्टीव कॉपेल यांनी एदू गार्सिया याला करारबद्ध केले आहे. गेल्या मोसमात बेंगळुरू एफसीकडून गार्सियाने चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय दिल्ली डायनॅमोजकडून प्रीतम कोटल याला पाचारण करण्यात आले आहे. हा धडाकेबाज फुल-बॅक संघ भक्कम बनवितो. उजव्या बाजूने त्याच्या चाली आघाडी फळीला भेदक आक्रमणासाठी बहुमोल ठरू शकतात.

कॉपेल यांनी सांगितले की, आम्ही संघात घातलेली नव्या खेळाडूंची भर सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही फार उत्साहात आहोत. हे खेळाडू अपेक्षित कामगिरी करून दाखवतील आणि मैदानावरील खेळाद्वारे चाहत्यांना आनंद देतील अशी आशा आहे. नव्या वर्षाला चमकदार सुरवात करण्यास आम्ही आतूर आहोत. मुंबई आणि जमशेदपूर या संघांनी या कालावधीत कोणत्याही नव्या खेळाडूंना घेतलेले नाही, पण पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याची पुरेपूर आशा दोन्ही संघांना असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)