नवी दिल्ली – करोनावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याने यंदा होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पूर्णच रद्द केली जाण्याचे संकेत मंडळाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिले आहेत. आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी जर करोनाचा धोका कायम राहिला तर ही स्पर्धा जुलै व सप्टेंबरमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यावेळीही अनेक संघांच्या मालिका असल्याने ही स्पर्धा तेव्हा आयोजित करणे शक्य होणार नाही अशा परिस्थित यंदाची आयपीएल स्पर्धा रद्दच करावी लागेल, अशी शक्यताही या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे
आयपीएलमधील विविध संघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भक्कम कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रक्रियेतून विकत घेतले आहे. त्यात यंदा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीच दबदबा राखला आहे. अनेक खेळाडूंना कोटी-कोटी रुपयांचा करार देण्यात आला आहे.
ही स्पर्धा जर रद्द केली तर संघ मालकांचेच नव्हे तर खेळडूंचेही प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 15.5 कोटी मिळवत बाजी मारली होती. ही स्पर्धा रद्द झाली तर खेळाडूंसह मंडळाला अंदाजे 8 ते 10 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.