ऑलिंपिक पदकाचे स्वप्न साकारणार – सरनोबत

पुणे – लंडन येथील ऑलिंपिकच्या वेळी नवीन खेळाडू होते. आता मात्र जागतिक स्तरावरील स्पर्धांचा भरपूर अनुभव मिळाला आहे, त्याच्या जोरावर टोकियो येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये मी निश्‍चितच पदकाचे स्वप्न साकार करीन असा आत्मविश्‍वास आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत तिने व्यक्त केला.

कोल्हापूरची खेळाडू राही हिची आगामी ऑलिंपिक स्पर्धेतील 25 मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारासाठी निवड झाली आहे. लंडन येथे 2012 मधे झालेल्या ऑलिंपिकमध्ये तिचे ब्रॉंझपदक थोडक्‍यात हुकले होते. ती सध्या शिवछत्रपती क्रीडानगरीत जर्मन प्रशिक्षिका मूकबयर डोथसूरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या वार्तालापात तिने सांगितले की, ऑलिंपिक पदक मिळविणे की काही कमी वेळेत मिळविण्याची प्रक्रिया नसते. त्यासाठी दहा दहा वर्षे मेहनत घ्यावी लागते. लंडन ऑलिंपिकच्या वेळी मी खूप नवीन होते. भोजनकक्षात सेरेना विल्यम्ससह अनेक जगज्जेते खेळाडू पाहून मी खूप भारावून व भांबावून गेले होते. गेल्या 10-12 वर्षांत मला आता जागतिक स्पर्धांची सवय झाली आहे. आत्मविश्‍वासही उंचावला असून त्याच्या जोरावर अव्वल यश मिळविण्यासाठी मी कसून मेहनत घेत आहे.

राहीने पुढे सांगितले की, नेमबाजी खेळातील तंत्रामध्ये जागतिक स्तरावर सतत नवनवीन तंत्र विकसित होत असते. त्यामुळेच माझ्या खेळात ज्यांनी ऑलिंपिक पदक मिळविले आहे अशाच वरिष्ठ खेळाडूची मी प्रशिक्षक म्हणून निवड करणार होते. सुदैवाने डोथसुरी यांची भेट झाली. त्यांनी 1992 व 2008 मध्ये ऑलिंपिक ब्रॉंझपदक मिळविले आहे. महिला म्हणूनही मी त्यांच्याशी चांगल्या रीतीने सुसंवाद साधू शकेन म्हणूनच मी त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

ऑलिंपिकच्या तयारीविषयी ती म्हणाली की, पूर्वी मी दरवर्षी 10 ते 15 स्पर्धांमध्ये भाग घेत असे. माझ्या प्रशिक्षकांनी मला एका वर्षी 6 ते 7 स्पर्धांमध्येच भाग घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार स्पर्धा व सराव शिबिर याचे योग्य नियोजन करीत त्यानुसार माझा सराव सुरू आहे. सध्या शारीरिक तंदुरूस्तीवर भर देत आहोत. फेब्रुवारीपासून मानसिक तंदुरूस्तीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

नवोदित खेळाडूंवर दडपण नको

मनू भाकेर हिच्यासह अनेक नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू लागल्यानंतर भारताला भरपूर पदके मिळावीत म्हणून या खेळाडूंना आशियाई, राष्ट्रकुल आदी अनेक स्पर्धांमध्ये उतरविले जाते. 2024 व 2028 च्या ऑलिंपिकमध्ये त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा असेल तर आतापासून त्यांच्यावर स्पर्धांचे दडपण आणणे चुकीचे होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून नेमबाजी वगळल्यामुळे भारताचे जास्त नुक्‍सान होणार आहे. मात्र या स्पर्धांमध्ये कोणते क्रीडाप्रकार ठेवायचे हा सर्वेस्वी संयोजकांचा अधिकार असतो आणि याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्‍यकता आहे असेही राहीने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.