#AUSvIND : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटचे कमबॅक?

मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये चढाओढ मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये चढाओढ

-विश्‍वचषकाच्या दृष्टीने होणार संघ निवड
-रोहित शर्माला मिळू शकते विश्रांती
-रहाणे, ऋषभ, बुमराह करणार कमबॅक?

पुणे – भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावरून परतला असून विश्‍वचषकापूर्वी आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहे. भारतीय संघाला देखील विश्‍वचषकापूर्वी आपल्या संघासाठी उपयुक्‍त अशा अंतिम 15 खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. त्यामुळे 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघात अनेक बदल दिसण्याची शक्‍यता असून या दौऱ्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया दौरा आणि त्यानंतर होणाऱ्या आयपीएल स्पर्धा या सर्वांमध्ये संघामधील खेळाडूंना अतिकामाचा ताण होऊन विश्‍वचषक स्पर्धेत हे खेळाडू जायबंदी होऊ नयेत यासाठी बीसीसीआयने प्लेयर्स रोटेशन पॉलिसी अवलंबली आहे.

त्यानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघातून सलामीच्या जोडीला विश्रांती देण्याची शक्‍यता असून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना विश्रांती दिली जाईल. तर, त्यांच्या जागी लोकेश राहुल आणि अजिंक्‍य रहाणे हे दोघे संघासाठी सलामी करतील, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने एका इंग्रंजी वृत्तपत्राने दिली आहे. आता ज्या प्रमाणे रोहितला विश्रांती देण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे त्याचप्रमाणे विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेते विश्रांती देण्यात आली होती.

त्यामुळे कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात कमबॅक करू शकतो किंवा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही विश्रांती दिल्यास कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे हा एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.

त्याचबरोबर विश्‍वचषकासाठी भारतीय संघाला मधल्या फळीच्या चाचपणीसाठी ही अखेरची संधी असल्या कारणाने ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कारण, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघातील मधल्या फळीने साफ निराशा केल्यानंतर मधल्या फळीची चिंता भारतीय संघाला असून मधल्या फळीत खेळू शकतील अशा फलंदाजांचा शोध घेण्याची विश्‍वचषकापूर्वी संघाकडे ही अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघात विजय शंकर, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, केदार जाधव आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये चढाओढ असून त्यांना आता चांगली कामगिरी करून विश्‍वचषकासाठीच्या संघात जागा मिळवण्याच्या दृष्टीने अखेरची संधी असणार आहे.

तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची जागा जरी पक्‍की समजली जात असली तरी त्यासाठी रवींद्र जडेजा आणि विजय शंकर हे त्याला धक्‍का देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे.

तर, सध्या भारतीय फिरकी गोलंदाजीचे प्रमुख असणाऱ्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्‍यता असून त्यांच्या जागी रविचंद्रन अश्‍विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला जाण्याची शक्‍यता आहे. तर, वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्‍वर कुमार आणि मोहम्मद शामीला विश्रांती देऊन त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांना संघात निवडले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)