नवी दिल्ली – देशातील कोविड प्रकरणांची संख्या पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील नव्या कोविड रूग्णांची संख्या 3641 वर गेली आहे. सक्रिय केसलोड 20,219 वर पोहोचला आहे. मधल्या काळात दैनंदिन स्वरूपात आढळून येणाऱ्या नव्या रूग्णांची संख्या शंभराच्या खाली आली होती. दरम्यान आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांच्या कालावधीत महाराष्ट्रातील तीन, केरळ मध्ये चार आणि दिल्ली, कर्नाटक तसेच राजस्थानमध्ये प्रत्येकी एक असे एकूण अकरा जण कोविड मुळे मरण पावले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोविड मृत्यूंची संख्या 5,30,892 वर पोहोचली आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हीटीचा चा दर 6.12 वर नोंदवला गेला आहे. देशातील एकूण कोविड ग्रस्तांची संख्या आता 4 कोटी 47 लाखांवर गेली आहे. त्यातील 4 कोटी 41 लाख 75 हजार 135 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.