नवी दिल्ली – आतापर्यंत देशामध्ये करोनाचे तब्बल 1 कोटी 4 लाख 79 हजार 179 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं देशात आता कोरोना रुग्णसंख्येचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावताना दिसत आहे.
दर दिवशी देशात नव्यानं नोंद होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाल्याची बाब स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 12 हजार 584 नवे कोरोनाबाधित आढळून आले.
जून 2020 नंतर पहिल्यांदाच करोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकानं घट होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळं ही दिलासादायक बाब ठरली आहे. मागील 24 तासांच देशात करोनामुळं 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळं आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गानं दगावणाऱ्यांचा आकडा 1 लाख 51 हजार 327वर पोहोचला आहे.
गेल्या 18 दिवसांचा आढावा घेतला असता, देशभरात 300 हून कमी रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर येत आहे. ज्यामुळं करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 96.43 वर पोहोचला आहे. तर, मृत्यूदर 1.44 टक्क्यांवर आहे.