नवी दिल्ली – पुण्यासह देशातील सात मोठ्या शहरात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत घर विक्रीत वाढ झाली असल्याची बातमी ही माहिती संकलित करणाऱ्या अनारॉक या संस्थेने जाहीर केली आहे. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही घर विक्रीत वाढ होत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
ऍनारॉकने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिंसेबर या तीन महिन्यात सात मोठ्या शहरात 50 हजार 900 घरांची विक्री झाली. जुलै ते सप्टेंबर दरम्यान 29 हजार 520 घरांची विक्री झाली होती.
गेल्या वर्षी 2 लाख 61 हजार घरांची विक्री झाली होती. यावर्षी मात्र त्यामध्ये 47 टक्क्यांची घट होऊन ही विक्री 1 लाख 38 हजार इतकी झाली आहे. या वर्षाच्या विक्रीवर करोना व्हायरसचा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर डिसेंबर या काळात घर विक्री वाढल्यानंतर आगामी काळातही ती वाढण्याची शक्यता असल्याचेचे ऍनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर कमी आहेत. ते काही काळ तरी कमी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. एकतर घराच्या किमती स्थिर आहेत किंवा थोड्या कमी झाल्या आहेत. विकसक आहेत ती घरे विकण्यासाठी बऱ्याच सवलती देत आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी मर्यादित काळासाठी मुद्रांक शुल्कात घट केली आहे. त्यामुळे ज्यांना घर खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. याच काळात नागरिक घरखरेदीसाठी प्रयत्न करण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळात घर विक्री वाढत जाईल, असे त्यांनी सांगितले.
घरांचे दर माफक असणाऱ्या शहरात पुणे –
देशात घरांचे दर माफक असणाऱ्या शहरात पुण्यासह अहमदाबाद आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. मुंबई भारतातील घरांच्या बाबतीत सर्वात महागडे शहर कायम आहे. नाईट फ्रॅंकने तयार केलेल्या माफक दर असलेल्या शहरांच्या यादीत अहमाबादचा क्रमांक एक वर आहे. दोन क्रमांकावर पुणे आणि चेन्नई आहेत. करोनामुळे आहे ती घरे विकण्याचा प्रयत्न विकसक री तआहेत. त्यामुळे सर्वच शेहरात घराचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.