राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘बेड्स शाॅर्टेज’वरून ठणकावले

मुंबई – राज्यात ज्या वेगाने बाधित संख्या वाढत आहे त्याच वेगाने बेडस्‌ची संख्या वाढवा, बेडस्‌ उपलब्ध नाहीत हे उत्तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून ऐकून घेतले जाणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे ठणकावले.

टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा गुरूवारी आढावा घेतला. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हावार महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या. त्यानंतर पत्रकारांना टोपे म्हणाले, बेड्‌स नाही हे उत्तर मला देऊन चालणार नाही. मी ते ऐकून घेणार नाही. रूग्णवाढीच्या संख्येनुसार बेड्‌सची संख्याही वाढवलीच पाहिजे, असा इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले.

टोपे म्हणाले, सध्याच्या काळात बेड व्यवस्थापन महत्वाचे आहे. वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्याच पाहिजेत. जिथे आवश्‍यकता असेल तिथे ऑक्‍सिजन बेड्‌स वाढवले गेले पाहिजेत. रूग्णालयात जागा नसल्यास एखाद्या संस्थेत वाढावा, पण बेड्‌स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये, खासगी रूग्णलायतील 80 टक्के बेड्‌स ताब्यात घेतलेच पाहिजे, असे आदेश काढले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड आचारसंहितेची नियमावली बनवताना सामान्य रूग्णाला समोर ठेवून महत्वपूर्ण निर्णय घेतले, त्याची काटेकोर अंमलबाजवणी आवश्‍यक आहे, याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली. खासगी रुग्णालयातील बिलांच्या संदर्भात आपण ऑडिटर्स नेमले आहेत. त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच बिल दिले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व आदेश दिले असल्याचे टोपे यांनी सांगितले.

24 तासात तपासणीचा रिपोर्ट आलाच पाहिजे. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला गेला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. या काही प्रमुख मुद्यांवर आम्ही चर्चा केली आह,. अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.