हाथरस : स्थानबद्धतेत असल्यासारखे राहते पीडितेचे कुटुंब; सामाजिक संघटनेचा आक्षेप

लखनौ – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे ज्या मुलीला बलात्कार करून ठार मारण्यात आले होते त्या पीडितेच्या कुटुंबावर चोवीस तास पहारा आणि पोलिसी दडपणाखाली ठेवण्यात आले असून हे कुटुंबीय आज स्थानबद्धतेत असल्यासारखे जीवन जगत आहे असा आरोप एका सामाजिक संघटनेने केला आहे. या कुटुंबियांच्या स्थितीच्या संबंधात पीपल्स युनियन फॉर सिव्हल लिबरटी या संघटनने एक अहवाल सादर केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

या कुटुंबियांना निर्भया फंडातून मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणीही या संघटनेने केली आहे. या कुटुंबाचे सामाजिक जीवन उद्धवस्त झाले असून अन्य समाजापासून त्यांना तोडण्यात आल्यासारखीच त्यांची आजची स्थिती आहे अशी माहिती या संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारांना सांगितली.

या कुटुंबियांना सीआरपीएफचे संरक्षण देण्यात आले होते पण ते आता काढून घेण्यात आल्याने आपल्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असा या कुटुंबियांचा दावा आहे. या कुटुंबातील पीडित मुलीचे मध्यरात्री अत्यंसंस्कार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संबंधात जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार, पोलिस अधिक्षक विक्रमवीर आणि त्या हद्दीतील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांवर कारवाई केली जावी अशीही त्यांची मागणी आहे. या कुटुंबाच्या बदनामीचेही षडयंत्र तेथे राबवले जात असून यात सहभागी असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई केली जावी आणि या कुटुंबियांना मोकळा श्‍वास घेता यावा अशी अपेक्षाही या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.