नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका दलित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तिकडे निघालेल्या केरळातील एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.
त्या प्रकरणात केरळातील श्रमिक पत्रकारांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर कोर्टाने जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी पत्रकारांच्या संघटनेचे हे अपिल विचारात घेण्यास आज मान्यता दिली.
तथापि ही सुनावणी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याऐवजी पहिल्या आठवड्यात घ्यावी ही पत्रकार संघटनचे वकिल कपिल सिब्बल यांची मागणी मात्र कोर्टाने अमान्य केली. सादिक कप्पन असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. तथापि ते ज्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करीत असल्याचा दावा करीत आहेत ते वृत्तपत्र दोन वर्षांपुर्वीच बंद झालेले आहे असा दावा उत्तरप्रदेश सरकारकडून करण्यात आला आहे.