अखेर पालकमंत्र्यांना मिळाला नगरसाठी वेळ; करोनास्थितीच्या आढाव्यासाठी उद्या जिल्ह्यात बैठका

नगर – करोनाचे संकट गंभीर असल्याच्या मुद्यावर देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये गणना झालेल्या नगर जिल्ह्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अनेक दिवसांतून वेळ मिळाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या दौर्‍याची प्रेसनोट प्रसार माध्यमांना पाठविण्यात आली आहे. पालकमंत्री मुश्रीफ करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेणार असून, कोविड केअर सेंटरमधील सुविधांचीही पाहणी करणार आहेत.

शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता ते जुहू विमानतळ येथून खासगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता शिर्डी विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. तेथून ते कोविड केअर सेंटर व 250 बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरच्या पाहणीसाठी जाणार आहेत. सकाळी दहा ते पावणे अकराच्या दरम्यान राहाता तालुक्यातील करोना स्थितीची पाहणी व उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. श्री साईबाबा हॉस्पीटल हॉल, शिर्डी येथे ही बैठक होईल.

सकाळी पावणे अकरा वाजता शिर्डी येथून शासकीय मोटारीने ते कोपरगावला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता कोविड केअर सेंटर, एसएसजीएम कॉलेज कोपरगाव येथे पाहणी करतील. सकाळी सव्वा अकरा वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील 300 बेड्स कोविड सेंटरची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते कोपरगाव तालुक्यातील कोरोना स्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा घेणार आहेत. कृष्णाई मंगल कार्यालय येथे ही बैठक होईल.

दुपारी 1 वाजता ते नगरला शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ते जिल्हयातील करोनास्थितीचा आढावा, लसीकरण व त्यावरील उपाययोजना, याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक होणार आहेत.

‘आयएमए’च्या पदाधिकार्‍यांशी करणार चर्चा…!
पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या दुपारी तीन वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्यांशी चर्चा करणार आहेत. करोना संकटात रुग्णांना मिळणार्‍या वैद्यकीय सुविधा व रोज वाढणार्‍या रुग्णांसाठी नव्याने बेड्स उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ते डॉक्टरांशी संवाद करणार आहेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. बापू कांडेकर, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. बापूसाहेब गाडे यांच्यासह प्रमुख डॉक्टरांना या बैठकीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब जगताप यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.