नागपूर – मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावली आहे. यासोबतच उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापठाच्या कुलसचिवांनाही नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदांमध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीवरून आधीच वाद निर्माण झाला आहेत. त्यानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. डॉ. वंजारी या नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्राध्यापक होत्या. जुलै 2016 मध्ये त्यांची निवड ही एसएनडीटीच्या कुलगुरू म्हणून झाली. कुलगुरू म्हणून त्यांनी येथील कार्यकाळ पूर्ण करून त्या 2021 मध्ये निवृत्त झाल्या. मात्र, एक वर्ष होऊनही त्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही.
अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्यावर त्यांना केवळ प्रोफेसर दर्जाचे निवृत्ती वेतन लागू करण्यात आले. मात्र, डॉ. वंजारी कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांना कुलगुरू पदाला लागू होणारे निवृत्ती वेतन द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. यावरून उच्च न्यायालयाने राज्यपालांसह अन्य प्रतिवादींना उत्तर मागितले आहे.