नवी दिल्ली- जागतीक बाजारातून आलेल्या संकेतानुसार सोमवारी सोन्याच्या दरात माफक वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 35 रुपयांनी वाढून 45,110 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 383 रुपयांनी वाढून 59,138 रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. चीनमधील एव्हरग्रॅंडे कंपनीसमोर कर्जाचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले.
मोतीलाला ओसवाल फायनान्शियल सर्व्हीसेस या कंपनीचे उपाध्यक्ष नवनित दमानी यांनी सांगितले की, चीनमधील पेचप्रसंगाशीवाय आगामी काळात होणाऱ्या व्याजदरवाढीमुळे गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. भारतामध्ये अगामी काळात बरेच सण येणार आहेत. त्यामुळे भारतात या काळता सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचीत केले.