दरवर्षी अक्षय तृतीया हा सण सोने-चांदी खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. सोन्या चांदीच्या बाजारपेठा अक्षरशः फुलून जात असतात. त्याच बरोबर देशात मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या दिवशी सनातन धर्म मानणारे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा-अर्चना करतात आणि दानधर्मही करतात.
त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीया निमित्ताने सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार रुपये इतका झाला आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजकडून देण्यात आली आहे.
आजचा सोने-चांदी चा भाव काय ?-
दरम्यान, आज सोन्याचा भाव 510 रुपयांनी कमी झाला असून 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 920 रुपयांनी घसरून 74,680 रुपये प्रति किलोवर इतका झाला आहे”. अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिली आहे.
परदेशी बाजारातही सोन्याच्या भावात घसरण-
परदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली असून अनुक्रमे 1,986 डॉलर प्रति औंस आणि 24.79 डॉलर प्रति औंस घसरण इतकी झाली आहे.